पुणे: पुण्यातील मावळ तालुक्यातील तिकोना गडावरून (वितंडगड) २५० फूट खोल दरीत कोसळल्याने तळेगाव दाभाडे येथील हार्दिक माळी या २५ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. हार्दिक हा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. मित्रांसह तो तिकोना गडावर भटकंतीसाठी गेला होता. त्याचवेळी त्याचा अपघाती मृत्यू ओढवला. दरम्यान, कड्यावर आणखी पाच जण अडकले असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तिकोना किल्ल्याच्या दक्षिण बाजूला भटकंती करत असतानाच पाय घसरून हार्दिक माळी खाली कोसळला. त्यात जबर जखमी झाल्याने हार्दिकचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडला होता. हार्दिकसोबत त्याचे मित्रही होते. हार्दिक बुरुजावरून खाली कोसळल्यानंतर तिकडे धाव घेणारे हार्दिकचे मित्र कड्यावर अडकले असून त्यातील तीन जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे तर अन्य दोघांना माघारी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच मावळ तालुका प्रशासनाने तातडीने पावले उचलत एक पथक घटनास्थळी दाखल केले आहे. दुर्गवाडीची टीम वैनतेयचे कार्यकर्तेही मदतकार्य करत आहेत.
हेडफोनपायी गमावला जीव?
हेडफोनमुळे हार्दिकला जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. हेडफोन पडल्याने तो काढण्यासाठी हार्दिक वाकला आणि त्याचवेळी तोल जाऊन खाली पडल्याने दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबत अद्याप प्रशासनाकडून वा तपास यंत्रणेकडून कोणताच दुजोरा मिळालेला नाही.
सौजन्य: महाराष्ट्र टाइम्स