पुणेः सिंहगडावर पर्यटनासाठी गेलेला एक तरुण सूर्यास्ताचा फोटो काढत असताना सुमारे २०० ते २५० फूट दरीत कोसळला. ‘गिरिप्रेमी’ टीमकडून या तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हा तरुण नागपूरचा असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी असलेल्या या तरुणाचे नाव प्रविण ठाकरे आहे. सध्या तो पुण्यातील टेक महिंद्रा कंपनीत नोकरी करत आहे. गुरुवारी दुपारी हा तरुण एकटाच सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. किल्ल्यावरील राजाराम महाराजांच्या समाधीच्या मागे एमटीडीसीजवळील कड्यावरून सूर्यास्ताचा फोटो घेताना सुमारे २०० ते २५० फूट दरीत कोसळला. प्रविण याने अपघाताची माहिती नागपूरमधील मित्रांना सांगितली. मात्र, त्यानंतर तो बेशुद्ध झाल्याने पुढील संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही.
नागपूरमधील त्याचे मित्र शुक्रवारी सकाळी पुण्यात पोहोचले. त्यांनी एमएमआरसीसीच्या हेल्पलाईनवर रेस्क्यूसाठी संपर्क साधला. त्यावेळी गिरिप्रेमीची टीम गडावरच कार्यरत होती, त्यांना रेस्क्यूबद्दल कळविण्यात आले. गिरिप्रेमीच्या सिद्धार्थ जाधव, अतुल मुरमुरे, स्थानिक नागरिक सांगळे व नामदेव कोंडके अशा चौघांनी मिळून इतर नागरिकांच्या मदतीने दरीत उतरून प्रविण यांना सुखरूप गडावर घेऊन आले. दरम्यान, रुग्णवाहिका गडावर उपलब्ध करण्यात आली. प्रविण यांना आपल्या मित्रांच्या स्वाधीन करून रुग्णवाहिकेत बसविण्यात आले व पुढील उपचारांसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.
प्रविण यांना हात फ्रॅक्चर असून, मणक्याला इजा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शक्य तेवढ्या लवकर मदत पोहोचल्याने प्रविण यांच्या जीवावरील धोका टळला आहे.