मधमाशांचा हल्ला हा एरियल अटॅक असतो. त्यामुळे आपण त्यांचा मारा सहन करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही!
मधमाशा हल्ला करण्याची अनेक कारणे आहेत. काही वेळा वातावरणातील बदलामुळे देखील मधमाशा अचानक उठतात. धुरामुळे उठतात. आपण जो अंगावर बॉडी स्प्रे मारतो त्यामुळे उठतात. अचानक कुठे दरड कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला तरी मधमाशा उठतात. थोडक्यात त्यांना असुरक्षित वाटले की त्या संतापतात!
मधमाशा कुणाला चावतात ?
मधमाशा संतापल्यावर कोणालाही चावतात. माकडांना, जनावरांना, कुत्र्याला, गुरांच्या नाकाला. कोणालाही व कुठेही चावतात!
मध्यंतरी महाराष्ट्रातील एका गावामध्ये मृताला अंत्यसंस्कार करण्यासाठी नेणाऱ्या जमावावर मधमाशांनी अचानक हल्ला केला व त्यातील बर्याच जणांना रुग्णालयात ऍडमिट करावे लागल्याचे पेपर मध्ये आले होते. थोडक्यात काय. मधमाशा संतापल्यावर कोणालाही चावतात!
निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही, म्हणून यापुढे आपल्याला यातून काय मार्ग काढता येईल याची आपण इथे चर्चा करूया व तसे वागण्याचा प्रयत्न करूया!
प्रथम आपण Precaution is better than Cure या तत्वा नुसार प्रत्येक गिर्यारोहकाने कोणती काळजी घ्यावी याचा विचार करूया!
गिर्यारोहण करताना आपले शरीर पूर्णपणे झाकलेले कसे ठेवता येईल ?
१) फुल पॅन्ट असावी
२) फुल शर्ट घालावे
काहीजण फुल शर्ट ऐवजी हाफ शर्ट जास्त पसंत करतात. मग त्यांनी बाजारात सहज उपलब्ध असलेले स्लीव्ह घालावेत, म्हणजे हात झाकले जातील व बाह्यांमधून हवा खेळती राहिल्यामुळे गरमही होणार नाही.
३) कॉटनचे हातमोजे घालावेत. याचा दुसराही फायदा होतो. आपल्याला काटे किंवा खडबडीत रॉक लागून जखम होण्याची शक्यता असते ती होत नाही.
४) डोक्यावर टोपी असावी, कारण मधमाशा केसांमध्ये ही घुसतात व डोक्याला चावतात. गोल टोपी असेल तर जास्त चांगली!
५) डोक्यावर किंवा गळ्यामध्ये बफ असावा. याचा दुहेरी फायदा होतो … मधमाशांचा अटॅक झाल्यावर बफ पूर्ण तोंडावर झाकून घ्यावा. मधमाशा उघड्या अंगावर हल्ला करतात.
पावसाळ्यानंतर विविध प्रकारचे गवताचे अतिशय बारीक बी व परागकण वाऱ्यामुळे हवेमध्ये पसरत असते. ते नाकात गेल्यामुळे खूप त्रास होतो … काहींना तर अशा परागकणांची ऍलर्जी असते. गवतातून जाताना बफ नाकावर आणावा. एरवी खाली करावा
६) प्रत्येक गिर्यारोहकाने एखादे मोठे टॉवेल किंवा लुंगी किंवा पातळ चादर आपल्या सॅकच्या सर्वात वरच्या कप्प्यात सहज मिळेल अशी ठेवावी. मधमाशांच्या हल्ला झाला की ती लगेच बाहेर काढून अंगाभोवती गुंडाळून आरडा ओरडा न करता व हालचाल न करता गपचूप बसून रहावे.
७) खूप मधमाशा चावल्यावर बर्याच जणांना उलटी व डिसेंट्री होते. यासाठी प्रत्येकाजवळ मुबलक पाणी व ORS पावडर असणे गरजेचे आहे
८) बॉडी स्प्रेचा वापरू नये.
ट्रेक आखणाऱ्या संयोजकांनी शिबिरार्थींना वरील गोष्टी सक्तीने आणावयास सांगणे. व जे कोणी आणणार नाहीत त्यांना घरी पाठवून द्यावे. कारण दुर्घटना झाल्यावर संयोजकांनाच इतरांच्या रोषाला सामोरे जावे लागते!
दुसरे महत्त्वाचे म्हणजे ट्रेक दरम्यान कोणीही शेकोटी वा आग पेटवू नये. त्याच्या धुराने मधमाशा उठतात.
ट्रेकच्या सुरू करण्यापूर्वी संयोजकांनी शिबिरार्थींना काय करावे व काय करू नये यासंबंधी माहिती देताना वरील गोष्टींचीही माहिती द्यावी.
आपल्या सह्याद्रीत दोन प्रकारच्या माशा खूप घातक आहेत. एक मधमाशी व दुसरी गांधील माशी.
प्रत्येक गिर्यारोहकाने गुगलच्या माध्यमातून वरील माशांचे फोटो नीट अभ्यासावे. जंगलात फिरताना बघितल्यावर कुठली मधमाशी आहे व कुठली गांधील माशी आहे हे ओळखता येणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर चुकीचे प्रथमोपचार केल्यामुळे परिस्थिती गंभीर बनू शकते !
मधमाशीचे विष Acidic असते तर गांधील माशीचे विष अल्कलाइन असते.
दोनही माशांच्या शरीराच्या शेवटाला एक काटा म्हणजेच Stinger असतो व त्यातील मसलमध्ये विष असते.
हा काटा बास्तिक बाणासारखा असतो. जेव्हा या माशा डंख मारतात तेव्हा हा काटा बास्तीक बाणाच्या आकाराचा असल्यामुळे आपल्या शरीरात रुतून बसतो. काटा त्यांच्या शरीरापासून अलग झाल्यावर त्यातील मसल ऍक्टिव्हेट होतात व ते आकुंचन व प्रसरण पावायला लागतात (आपल्या हृदयाचे मसलही असेच आकुंचन व प्रसरण पावत असतात). त्यामुळे त्या काट्यामधील विष बाहेर पडून शरीरात पसरायला सुरुवात होते व त्यामुळे त्या व्यक्तीची परिस्थिती जास्त गंभीर बनते.
मग जर का आपण plucker ने हा काटा लगेच काढून टाकला तर शरीरात जे जास्तीचे विष जाणार होते त्याला अटकाव होईल की !
समजा आपल्याकडे प्लकर नसेल तर नखाने हा काटा खरवडायचा. त्यामुळे हा काटा तुटतो व आतून बाहेर विष येण्याचे थांबते !
मधमाशीचे विष Acidic असते व ते neutralize करण्यासाठी कुठला तरी अल्कलाइन पदार्थ वापरणे गरजेचे आहे
गांधील माशी चे विष अल्कलाइन असते. ते neutralize करण्यासाठी कुठलातरी ॲसिडीक पदार्थ वापरणे गरजेचे आहे.
अर्थात हे पदार्थ असे हवेत की जे आपल्या कातडीला व शरीराला हानीकारक नसावेत.
प्रत्येक गिर्यारोहकाने आपल्यासोबत खालील वस्तू ठेवणे गरजेचे आहे. ते शक्य नसेल तर संयोजकांनी (तीन-चार मार्गदर्शकांनी) आपल्या सोबत खालील वस्तू ठेवाव्यात.
१) Plucker (beauty parlour च्या दुकानात छान प्लकर मिळतात). एरवी करवंदीचा काटा किंवा कुस काढण्यासाठी देखील plucker चा छान उपयोग होतो
२) Magnifying glass. काही वेळा नुसत्या डोळ्याने बघून काटा काढतात येत नाही. अशा वेळी Magnifying glass उपयोगी पडते.
३) मधमाशीचे विष ऍसिडिक असते … त्यामुळे त्या चावल्यावर प्रथम plucker ने काटा काढून टाकावा व चावलेल्या जागेवर खालील पैकी एका अल्कलाइन गोष्टीचा वापर करून ती जागा रगडावि.
- Baking Soda (किंचित पाण्यात टाकून त्याचे कॉन्सन्ट्रेटेड द्रावण बनवावे)
- Liquid Amonia
- Toothpaste (हे कमी परिणामकारक आहे).
४) गांधील माशीचे विष अल्कलाइन असते ते न्यूट्रल करण्यासाठी खाली वस्तूंचा वापर करावा
- Apple Sider Vinegar
- लिंबू (लिंबू कापू नये तर त्याला भोक पाडावे व लिंबू पिळून जखमेवर एक ते दोन थेंब टाकावेत व जखम बोटाने रगडावि. यामुळे लिंबाचा काटकसरीने वापर करता येईल!
५) खूप माशा चावल्यावर वांती वा डिसेंट्री होते. अशा वेळी त्या व्यक्तीला पाण्यामध्ये ORS पावडर घालून पिण्यास द्यावी !
ज्याच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे, त्याला संयोजकांनी प्रथम धीर द्यावा व त्वरित वरील प्रथमोपचार करावेत. पण लक्षात असू द्यावे की हे केवळ प्रथमोपचार आहेत. रुग्णाला त्वरित डॉक्टरकडे नेणे गरजेचे आहे. कारण शरीरात अति विष पसरले असेल तर काही वेळा रुग्णाला मृत्यू येऊ शकतो!
अशा अपघाताच्या वेळेस स्थानिक पोलीस स्थानकात कळविणे कायद्याने गरजेचे आहे !
अधिक माहितीसाठी गिर्यारोहकांनी www.healthline.com या साइटवर जाऊन Home Remedies for Bee Stings: What Works? चे नीट वाचन करावे.
– अरुण सावंत