भारतीय संस्कृतीत प्रदक्षिणेला असाधारण महत्त्व आहे. आपल्या देवदेवतांना श्रद्धेने प्रदक्षिणा घालायची प्रथा प्राचीन आहे. गणपतीने आपल्या आईला घातलेली प्रदक्षिणा तर आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकलेली आहे. पण गडाला प्रदक्षिणा? ट्रेक्किंगची आणि गडकिल्ल्यांची आवड निर्माण झाल्यावर १९८९ मध्ये मी राजगड प्रदक्षिणेला मोठ्या कुतूहलाने आलो.
प्रत्येक किल्ल्यावर गेल्यावर त्याच्या तटबुरुजांमधून खाली पाहताना नेहमी विचार यायचा की हाच तट, हाच किल्ला खालून कसा दिसेल? किती भव्य वाटेल हे सगळं? हे सगळं एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहयला मिळल्यावर काय नजरेस पडेल? राजगड प्रदक्षिणेच्या निमित्ताने मला हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. दि नेचर लव्हर्स या नामवंत संस्थेने आयोजित केलेली ही प्रदक्षिणा म्हणजे किल्ला, इतिहास आवडणाऱ्याला पर्वणीच! पायथ्याच्या गुंजवण्यातून वरती दोन तासांनी जेंव्हा गडावर पोहोचलो तेंव्हा अंगावर एक आनंदाचा शहारा आला. शिवाजी महाराज या इथे पंचवीस वर्षे राहिले! आपण पुस्तकात वाचलेल्या अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या! आग्र्याहून सुटका, समोर सिंहगडावरचे अदभुत रणकंदन, प्रतापगडावरून परतलेले विजयी शिवराय! पद्मावती माचीवर मन इतिहास काळात जाते. देशाच्या इतिहासाला कलाटणी दिलेले कितीक प्रसंग इथे घडले.
पद्मावती माची शिवाय किल्ल्याला अजून दोन माच्या – सुवेळा आणि संजिवनी! गड दर्शनाच्या वेळेला या तिऩ्ही वरून पाहिल्या. सगळ्या अजूनही तटबंदीने वेढलेल्या! दुसऱ्या दिवशी प्रदक्षिणा! पहाटे लवकरच उठलो. पटकन आवरून त्या मस्त थंडीत आम्ही पद्मावती वरून खाली ऊतरलो. पण पुर्ण खाली नाही, तर थोडेसे ऊतरून कड्याखालच्या रानातून डोंगराला लागूनच निघालो. सुवेळा माची पर्यंतचा भाग सगळा जंगलातून जाणारा. आल्हाददायक असे वातावरण होते. थोड्या वेळातच गुंजवणे दरवाजा आला. मान उंचावली तर कड्याच्या वरती तो आजुबाजूच्या खडकासारखाच काळ्या दगडाचा दरवाजा त्या झाडीतही सुंदर वाटत होता. सगळे उत्साहात होते. त्या दाट झाडीतली वाट, खाली धुक्याने भरलेली दरी, समोर उगवतीकडे निमुळती गेलेल्या सुवेळाच्या सोंडेचे दृष्य एक प्रसन्न अनुभव देत होते.
कोणी केली ही पहिली प्रदक्षिणा? कोणाच्या डोक्यात आले हे? वरती विनायक मुळिक भेटला होता. त्याची कल्पना! तीन वर्षापुर्वी तो आणि प्रजापती बोधणे दोघांनी पहिली मोहिम आखली आणि आपल्या सहा साथिदारांबरोबर यशस्वी केली. पण सुवेळा खालच्या जंगलातून, काळेश्र्वरी बुरुजाच्या खालची ठिसूळ मातीतून, व अळूच्या आसपासच्या अनेक डोंगरसोंडातून हे कसे केले त्यांनी? आज जरी संस्थेच्या स्वयंसेवकांनी वाट व्यवस्थित करून ठेवलेली असली तरी १९८६ मध्ये नक्कीच इथे डुक्कर वाटांशिवाय फार काही नसणार. त्या सगळ्या साहसीविरांबद्दल कौतुकाने मन भरून आले.
काळेश्र्वरी बुरुजाला पोहोचलो तेंव्हा सुर्य वरती चढला होता व अंगातील वरचा स्वेटर पाठुंगळीला गेला. बराच वेळ त्या बुरुजाचे निरिक्षण करूनही त्याचा दरवाजा काही दिसला नाही. असा किल्ला जिंकणे म्हणजे किती अवघड असेल याची चांगलीच कल्पना आली. शत्रुच्या सैनिकांच्या मनात काय होत असेल? दुर्गमच आहे हा बुरुज. पण माझ्या मनाला सर्वात भावलेलला कुठला भाग असेल तर तो म्हणजे संजिवनी माची. दुपारचे जेवण करून आम्ही संजिवनीला वळसा घातला आणि संजिवनी माचीच्या बरोब्बर खाली आलो. सह्याद्रीतल्या किल्ल्यांच्या दृष्यांपैकी हे एक अप्रतिम दृष्यच म्हंटले पाहिजे. ह्या माचीची तटबंदी किल्ले बांधणीतला एक अद्वितीय नमुनाच! रमेश देसायांनी लिहिलेल्या शिवकालातल्या किल्ल्यांच्या बांधणीबद्द्लच्या ‘Shivaji – The last great fort architect’ या पुस्तकात या माचीचे खुप कौतुक वाचले होते. प्रदक्षिणेच्या वाटेवरून ते सगळे अगदी सार्थ वाटले. इथून ती माची आणि मागचा किल्ला पहातच राहावे. पाली दरवाज्यावरून पुढे चोर दिंडीतून वरती आलो, तेंव्हा समाधानाने मन तृप्त झाले होते.
त्यानंतर मी अनेकदा प्रदक्षिणेच्या कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमाला २५ वर्षे झाली, तेंव्हा पौर्णिमेच्या रात्री मस्त चांदण्यातही प्रदक्षिणा केली. वर निनाद बेडेकर, प्र के घाणेकर, पाडुरंग बलकवडे, आप्पा परब, भगवान चिले या सगळ्यांकडून गडाच्या इतिहासाचे अनेक पैलू ऐकले. शेकडो प्रदक्षिणार्थींबरोबर हा राजगड माझाही होऊन गेला. त्याचे आकर्षण जराही कमी झाले नाही. कदाचित राजगडावर मनापासून प्रेम करणाऱ्या या सर्व वेड्यांमुळेच हा कार्यक्रम अव्याहत चालला आहे. तीस वर्षांनंतर यंदा याचे संयोजन संस्थेने माझ्याकडे सोपवले आहे. एव्हढ्या मोठ्या कार्यक्रमाचा खटाटोप किल्ल्यावर घालायचा म्हणजे मोठीच जबाबदारी. शालेय मुलांपासून ते सत्तरीतली लोक इथे येणार, चार दिवस राहणार, विसेक किलोमिटरची प्रदक्षिणा करणार! पण संस्थेत काहीही न सांगता जबाबदारीने काम करणाऱ्यांची संख्याही तेव्हढीच! राजगड प्रदक्षिणा म्हंटले की ऊत्साहाने सळसळणारे सर्व सभासद आपसूकच कामाला लागतात. त्यामुळे मला काळजीच नाही. सगळ्यांबरोबर परत त्या गडावर जावे, सर्वांबरोबर त्या गडांच्या राजाचे कवतिक पाहावे म्हणजेच राजगड प्रदक्षिणेचा उत्सव!
राजगोपाल पाटील