‘मी २१ पर्यंत अडकलो आहे, पण २३ चालेल डियर!’
कुठल्याही मेसेजच्या शेवटी ‘डियर’ हे अरुणचं नेहमीचं आवडतं पालुपद असायचं. येत्या २३ जानेवारीला ‘मॅक संवाद’ या कार्यक्रमात अरुण सावंत गिरीभ्रमणातील सुरक्षितता या विषयावर व्याख्यान देण्यासाठी येणार होता. त्याचा सह्याद्रीतील गिरीभ्रमणाचा, प्रस्तरारोहणाचा (रॉक क्लायंबिंग) आणि आडवाटांवरील भटकंतीचा अनुभव उदंड, म्हणूनच आजच्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्यासारखा वक्ता ‘मॅक’साठी मिळणं हे यथोचित होतं! पण आता ते घडणार नाही हे दुर्दैव!
१९७४ साली सह्याद्रीतील डोंगरी वाटांनी अरुणला वेड लावलं. सुरवातीस हिरा पंडित, गिरीविहार अश्यांच्या सोबतीने अभ्यासपूर्वक भटकंती आणि चढाया त्यानं सुरु केल्या आणि लवकरच अरुण एक प्रथितयश गिर्यारोहक झाला. ८५ सालातील ‘ड्युक्स नोज’ ही चढाई, ८६ साली कोकणकड्यावरील रेस्क्यू, सांधण दरी अश्या अनेक साहसी मोहिमा त्याच्या नावावर आहेत. आजही, साठीनंतर त्याचा फिटनेस हेवा वाटावा असाच आहे. (होता म्हणणं अवघड जातंय!) अनेक तरुणांना त्याने मार्गदर्शन करून गिर्यारोहणासाठी, गीरीभ्रमणासाठी प्रोत्साहित केलं. त्याची विक्रमी कारकीर्द थक्क करणारी आहे.
१९८५च्या सुमारास मी त्याच्या संबंधी ऐकून होतो. त्यांच्या ‘ड्युक्स नोज’ चढाईनंतर माझ्या मनात एक अव्यक्त चढाओढीची भावना होती कारण आम्ही कोकणकडा मोहीम त्याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यात आयोजित करत होतो. आमच्या यशस्वी चढाई नंतर मुद्दाम ठाण्याला येऊन अभिनंदन करणारा पहिला माणूस होता ‘अरुण सावंत’! अश्या दिलदार माणसाची पुढे ओळख वाढत गेली आणि माझ्या मनात त्याच्याबद्दल नेहमीच एक आदराची भावना होती.
‘अरुण सावंत’ म्हटलं की सावळा वर्ण, काहीसे खोल डोळे पण नजरेत एक मनस्वी भाव, सडपातळ शरीरयष्टी, दांडगा स्टॅमिना असं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं रहातं. सामान्य परिस्थिती असूनही चिकाटीनं गिर्यारोहण करणारा, निर्व्यसनी, काटकसरी अरुण हा अनेकांसाठी आदर्श होता. फारसं न बोलणारा पण अफाट गोष्टी करून दाखवणारा अरुण अनेकांना आठवत असेल.
आज गिरीभ्रमण अफाट लोकप्रिय झालं आहे पण त्याचबरोबर सुरक्षितता आणि पर्यावरणाचं भान सुटत चाललं आहे. याच कारणानं ‘मॅक’ या संस्थेची स्थापना झाली. अरुणशी हा विषय काढताच, ‘अरे, आपल्यासारख्या जुन्या जाणत्यांनी असा पुढाकार घेतलाच पाहिजे. सह्याद्रीत अनेक ठिकाणी घडणाऱ्या गोष्टी पाहून चिडचीड होते. लोकांना ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत!’ अरुण अतिशय तळमळीने बोलत होता. शिवरायांच्या सह्याद्रीत डोंगर, सुळक्यांची नावं मराठी असावी म्हणून अरुण अतिशय आग्रही असे. ‘साहस अवश्य करावं पण सुरक्षिततेचं आणि पर्यावरणाचं भान ठेवूनच’ यासाठी त्याचं वागणं बोलणं आदर्शवत होतं. अशी माणसं आज दुर्मिळ होत चालली आहेत. अरुणच्या, माझ्या पिढीला बापूकाका पटवर्धन, ओवळेकर, माळीसर, हरीश कापडिया असे आदर्श लाभले. नंतरच्या पिढीला आदर्शवत असणारा अरुण आज नाही, ह्यावर विश्वास बसत नाही! अश्या दुःखद प्रसंगी, कोकणकड्यावर गिर्यारोहण करत असतांना अरुणला मरण यावं हा दैवी संकेत असावा अशी आपण आपली समजूत काढायची! अरुणच्या अकस्मित जाण्यानं गिर्यारोहण क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्याचा आदर्श आणि त्याला प्रिय असणारी गिर्यारोहणातील सुरक्षितता आपण मनःपूर्वक बाळगणं हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल.
एकच म्हणावसं वाटतं, ‘हे रे काय, अरुण डियर?’
English version??
It’s gem of person for sahyadri really we lost