(गिर्यारोहणातील व्यावसायिक आणि धर्मादायसंस्था (Mountaineering/Hiking Clubs)

महाराष्ट्रात गिर्यारोहणाशी संबंधित विविध साहसी उपकम व्यावसायिक आणि ‘ना नफा ना तोटा’ अशा दोन्ही प्रकारे आयोजित केले जातात. ना नफा तत्त्वावर, एक सामाजिक बांधिलकी किंवा छंदाची जोपासणी म्हणून गिर्यारोहण करणाऱ्या अनेक संस्था (mountaineering/hiking club) महाराष्ट्रात कार्यरत आहेत. साधारण १९५५ सालापासून महाराष्ट्रात आधुनिक गिर्यारोहणाला सुरवात झाली. आधुनिक अशासाठी म्हटले की सह्याद्री, सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या, या पर्वतरांगामध्ये शेकडो किल्ले, हजारो मंदिरे आणि कैक लेणी बांधणाऱ्या मराठी माणसाला बाळकडू गिर्यारोहणाचेच आहे. पण पुरातन काळात गिर्यारोहण ही जीवनशैली होती ती आता हौस किंवा छंद आहे एवढेच. जर २५ वर्षाची एक पिढी गृहीत धरली तर हौशी गिर्यारोहणाची आता तिसरी पिढी सुरू आहे. १९७० ते १९९० च्या या दोन दशकात महाराष्ट्रातील गिर्यारोहण खऱ्या अर्थाने बहरले, किंबहुना हा कालखंड गिर्यारोहणाचा सुवर्णकाळ होता असेही म्हटले तरी चालेल. सह्याद्रीतील अनेक बेलाग सुळके, प्रस्तरभिंतीवरील प्रथम आरोहण याच काळात झाले. याच दरम्यान आपले धडपडे गिर्यारोहक हिमालयाकडेही वळले. सतोपंथ, कामेत, कांचनगंगा अशा हिमालयातील वैशिष्ट्यपूर्ण मोहिमा याच काळात झाल्या.

रूढार्थाने गिरीभ्रमण/गिर्यारोहण जेव्हा वैयक्तिक उत्पन्न अथवा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी केले जाते तेव्हा ते व्यावसायिक ठरते. महाराष्ट्रातील व्यावसायिक स्तरावरील गिर्यारोहण त्यामानाने उशिरा म्हणजे १९९० साला नंतर सुरु झाले आणि गेल्या १०-१५ वर्षात त्याचा झपाट्याने प्रसार झाला. त्या अर्थाने व्यावसायिक गिर्यारोहणाची सध्या पहिलीच पिढी चालू आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षात दळणवळणाची सुलभता, अनेक प्रकारच्या गिर्यारोहण साधनांची आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता, साहसी क्रीडा प्रकारांना लाभलेली लोकप्रियता अशा विविध कारणाने व्यावसायिक स्तरावर साहसी क्रीडाप्रकारातील उपक्रम आयोजित करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढते आहे. साहसी व्यवसायात अनेक वर्षे जम बसवलेल्या प्रतिष्ठित कंपन्या आहेत तसेच तरुण, नवोदितही आहेत.

क्लब किंवा हौशी गिर्यारोहकांना आव्हानात नावीन्य, नवनवीन ठिकाणे/मार्ग शोधणे, आपल्या शारीरिक/मानसिक/तांत्रिक क्षमता पणाला लावणाऱ्या गिरिभ्रमण मोहीमा (Range Trekking) आयोजित करण्यात रस असतो. तसेच काही अपवाद वगळता, एकदा भेट दिलेल्या ठिकाणी परत-परत जायला हौशी गिर्यारोहक सहसा तयार नसतात. प्रस्तरारोहण (Rock Climbing) मोहीमा निव्वळ हौशी गिर्यारोहकच करतात. तसेच हिमालयातील कठीण अशा अति उंची वरील शिखरांवर चढाई हौशी गिर्यारोहकच करतात. थोडक्यात म्हणजे गिर्यारोहणातील तीनही प्रकारात – प्रस्तरारोहण, गिरिभ्रमण आणि हिमालयातील चढाया – यात हौशी गिर्यारोहकांना रस असतो. साहजिकच गिर्यारोहणातील सर्वांगीण कौशल्य हौशी गिर्यारोहकांकडे जास्त असतं. असे असल्यानेच सह्याद्रीतील बचाव कार्यात, संकट समयी मदतकार्यात हौशी गिर्यारोहकांच्या संस्था आघाडीवर आहेत.

व्यावसायिक गिर्यारोहणाचा विचार केला तर त्यांचा भर सर्वांगीण गिर्यारोहणा पेक्षा गिरिभ्रमणावर जास्त असतो. यात शनिवार-रविवारी होणारे सोपे ट्रेक, गड-किल्ले किंवा एखाद्या डोंगरमाथ्यावर मुक्काम, Camping, निसर्गभ्रमण असे कार्यक्रम असतात. तर Rappelling, Valley Crossing, Tyrolean Traverse असे तांत्रिक कौशल्यावर आधारित, पण सहभागींकडून कुठल्याही विशेष तांत्रिक कौशल्याची अपेक्षा नसणारे साहसी उपक्रम असतात. यात शारीरिक क्षमतेपेक्षा एक थरारक अनुभव ही भावना जास्त असते. तसेच एखाद्या लोकप्रिय ठिकाणी वारंवार जाणे याचे व्यावसायिक संस्थांना वावडे नसते. किंबहुना ती एक व्यावसायिक अपरिहार्यताही असते. व्यावसायिक गरज म्हणून अनेक जबाबदार व्यावसायिक संस्था आपल्या मनुष्यबळाला प्रथमोपचार, नेतृत्त्वकला, तांत्रिक कौशल्यात प्रशिक्षण देणारे विविध कोर्सेस आयोजित करतात.

या पार्श्वभूमीवर तुलना केली तर व्यावसायिक आणि हौशी गिर्यारोहणात काहीच साधर्म्य नाही, दोन्हींची कार्यक्षेत्रं पूर्ण वेगळी आहेत, त्यांचे हितसंबंध पूर्णपणे वेगळे आहेत – प्रसंगी परस्पर विरोधी आहेत असे कुणालाही वाटणे साहजिक आहे. पण खरोखरीच असे आहे काय? आपण इथे त्याचा कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता विचार करूया.

१. साहसी खेळातील तीन प्रकारांपैकी (जमिनीवरील, पाण्यातील आणि हवेतील) फक्त गिर्यारोहणातील आयोजकातच व्यावसायिक आणि हौशी (धर्मादाय) संस्था असा ठळक फरक आहे. बाकी सर्व साहसी उपक्रम (उदा. राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, स्कुबाडायव्हिंग, बंजी जम्पिंग इ.) संपूर्णपणे व्यावसायिक स्तरावरच आयोजित केले जातात. म्हणजेच साहसी खेळातील गिरीभ्रमण/गिर्यारोहण या एकाच क्षेत्रात हौशी संस्था आहेत. अर्थात हे क्षेत्र खूप मोठे आहे यात शंकाच नाही.

२. गिर्यारोहणात देखील काही अपवाद वगळता हिमालयातील सर्व प्रकारच्या गिर्यारोहण मोहिमांचे संपूर्ण व्यवस्थापन (प्रवास, जेवण, गिर्यारोहण साधने, शेर्पा इ.) हे व्यावसायिक तत्त्वावर चालणाऱ्या एखाद्या स्थानिक एजन्सीलाच दिलेले असते. व्यावसायिक संस्थेकडून आयोजित केली जाणारी गिर्यारोहण मोहीम किंवा एखाद्या क्लबतर्फे आयोजित केली गेलेली मोहीम ही त्या अर्थाने व्यावसायिकच असते. फरक असलाच तर तो नफ्याच्या टक्केवारीत असतो. सह्याद्रीतील गिर्यारोहणात देखील तांत्रिक अंगाने जाणारे Rappelling, Waterfall Rappelling, Valley Crossing, Tyrolean Traverse असे उपक्रम व्यावसायिक तत्त्वावरच जास्त आयोजित केले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे हौशी क्लबना त्याच त्याच प्रकारचे कार्यक्रम करण्यात रस नसतो आणि त्यामुळे मनुष्यबळाची कमतरताही असते.

३. महाराष्ट्रातील नावाजलेल्या व्यावसायिक गिर्यारोहण संस्था या क्लब संस्कृतीतून गिर्यारोहणाचे, साहसाचे धडे गिरवलेल्या निष्णात गिर्यारोहकांनी सुरु केलेल्या आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील व्यावसायिक संस्थांची गंगोत्री हौशी गिर्यारोहकांच्या संस्थाच आहेत. त्यामुळे स्वतःची व्यावसायिक संस्था चालवणाऱ्या लोकांना आपल्या मूळ संस्थेबद्दल आणि हौशी गिर्यारोहणाबद्दल ममत्व निश्चितच असते. किंबहुना अशी नाळ जोडली गेली असल्याने, आजही व्यावसायिक गिर्यारोहणातील कित्येक यशस्वी व्यावसायिक आपल्या जुन्या क्लबशी जवळचे संबंध राखून आहेत. या दृष्टीने बघितले तर हौशी गिर्यारोहण आणि व्यावसायिक गिर्यारोहण यांच्यात गुरु-शिष्याचे नाते आहे असे आपण म्हणू शकतो.

४. ५ ते १० वर्षे छंद म्हणून गिर्यारोहण केल्यावर, विविध तांत्रिक, शारीरिक आणि नेतृत्त्वाची कौशल्ये मिळवल्यावर, काही गिर्यारोहक साहसी खेळ आयोजन हेच आपले व्यवसाय क्षेत्र निवडतात. कुठलाही व्यवसाय निवडण्याचा प्रत्येकाला घटनादत्त अधिकार आहे. त्यामुळे एखाद्याने गिर्यारोहणाशी संबंधित व्यवसाय निवडला तर त्यात आपल्याला वावगे वाटण्यासारखे काहीच नाही. जोपर्यंत असा व्यवसाय योग्यप्रकारे, सुरक्षेची सर्व काळजी घेऊन केला जातोय तोपर्यंत व्यवसाय म्हणून गिर्यारोहण करणाऱ्यांना कमी लेखण्यात किंवा त्यांनी काही मोठे पातक केले आहे असे म्हणण्यात काहीच हशील नाही. त्यांचा हेवा करण्यात तर त्याहून अर्थ नाही.

एखाद्या किल्ल्यावरील चढाई, मोकळ्या जागी कॅम्पिंग, जंगलातील भ्रमंती अशा गोष्टी करण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. सोप्या श्रेणीतील अशा साहसाचा (Soft Adventure) आनंद हवा असणारे आणि त्यासाठी खर्च करण्याची आर्थिक ऐपत असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही उत्पन्नाची उत्तम संधी महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी गमावली तर इतर कोणी तरी ती साधेलच. मग आपल्यातीलच उद्यमी गिर्यारोहकांनी ती साधून चांगल्या प्रकारे चालवल्या जाणाऱ्या व्यावसायिक गिर्यारोहण संस्था स्थापन का करू नयेत? आणि हौशी गिर्यारोहकांच्या संस्थांनी आपल्यातीलच होतकरू तरूणांना अशा व्यवसायात उतरण्यास प्रोत्साहन का देऊ नये? व्यावसायिक आणि हौशी गिर्यारोहणाच्या एकमेकातील पूरक संबंधाचे हे एक चांगले उदाहरण आहे.

५. कुठलाही कायदा (Income Tax Act सोडून) धर्मादाय आणि व्यावसायिक संस्था असा भेद करत नाही. मूलतः गिर्यारोहण कसे करावे, त्यातील सुरक्षा नियम, तांत्रिक उपकरणे हाताळण्याचे नियम हे सगळ्यांना सारखेच आहेत. गिर्यारोहणातील हलगर्जीपणाचे परिणाम आणि शिक्षाही सारखीच आहे. त्यात व्यावसायिक आणि धर्मादाय असा मतभेद नाही. मग जर कायदाच आपल्यात कुठलाही भेदभाव करत नाही (चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने) तर तो भेद आपण तरी का ठेवावा? आणि तसा भेद ठेवण्यात आपला कोणता फायदा आहे?

६. राजगड, हरिहर, राजमाची, रतनगड, हरिश्चंद्रगड, लोहगड-विसापूर, साल्हेर, कळसुबाई, कुलंग, माहुली अशा लोकप्रिय trekking ठिकाणी गर्दी वाढण्यामागे गिर्यारोहणातील व्यावसायिकच आहेत, जास्तीत जास्त पैसे कमावण्यासाठी त्यांनीच गिरिभ्रमणात गर्दी प्रमाणा बाहेर वाढवली, असा एक आक्षेप कायम घेतला जातो. आपण आधी वाढत्या गर्दीचा विचार करू. गेल्या साठ-सत्तर वर्षात सह्याद्रीच्या आसपासच्या परिसरातील शहरांची ( मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पनवेल, सातारा, कोल्हापूर इ.) लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. अनेक गड -किल्ले, डोंगरांच्या अगदी थेट पायथ्या पर्यंत आता रस्ते झाले आहेत. पायथ्याच्या गावांमध्ये आता राहण्याची, जेवणाची सोय उपलब्ध झाली आहे. गिर्यारोहणा संबंधी तपशीलवार माहिती आता ‘इंटरनेट’वर उपलब्ध आहे. एखाद्या किल्ल्यावर, डोंगरावर जाण्यासाठी पूर्वी इतके माहितगार व्यक्तीवर अवलंबून राहावे लागत नाही किंवा फार आगाऊ नियोजनही करावे लागत नाही. त्यामुळे पूर्वी आवाक्याबाहेर वाटणारी अनेक ठिकाणे आता सहज साध्य झाली आहेत. साहजिकच सगळीकडेच गर्दी वाढली आहे. संचार स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार सगळ्यांनाच असल्याने आपल्याला कितीही वाईट वाटले तरी या गर्दीला एका विशिष्ट मर्यादेपलीकडे बंधनं घालणं किंवा कमी करणं शक्य होणार नाहीये. या गर्दीतील बहुतांश लोक नवशिके, अननुभवी आणि एक दिवस ‘मजा करणे’ या हेतूने भटकायला आलेले पर्यटक असतात. या गटांना ना नेता असतो ना मार्गदर्शक असतो. कॉलेजमधील गट, ऑफिसमधील गट, सोसायटीतील गट आणि आता WhatsApp गट अशी त्या गर्दीची विभागणी असते. अर्थात वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे काही नवशिके व्यावसायिकही यात निश्चितच आहेत. अगदी कठोर शब्द वापरायचे तर त्यांना व्यावसायिक म्हणण्यापेक्षा संधीसाधू म्हणणेच जास्त योग्य ठरेल. अशा ठिकाणाची गर्दी ही निर्नायकी असते, त्यामुळेच बेशिस्त आणि बेभान असते. मात्र खऱ्या अर्थाने व्यावसायिक असणाऱ्या संस्था आणि एक निखळ आनंद देणारा छंद म्हणून गिरिभ्रमणाकडे पाहणाऱ्या हौशी गिर्यारोहकांच्या संस्था (क्लब) असे दोन्ही अशी तोबा गर्दीची ठिकाणे टाळतातच – जरी कारणे वेगळी असली तरी. हाडाच्या ट्रेकर्सना अजिबात गर्दी नसलेली अशी अनेक ठिकाणे माहित असतात म्हणून आणि व्यावसायिक संस्थांना गर्दीच्या ठिकाणी आपल्या ग्राहकांना अशा ठिकाणी नेऊन त्यांचा रोष ओढवून घ्यायचा नसतो म्हणून. म्हणजेच लोकप्रिय ठिकाणी गर्दी होण्यात प्रतिष्ठित व्यावसायिक संस्था तसेच जाणत्या हौशी संस्था दोघांनाही दोष देता येणार नाही. तसेच ही गर्दी टाळण्याकडे या दोघांचाही कल असतो

पण ही गर्दी एका भावी संकटाची नांदी आहे हे निश्चित. एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना (Stampede) अशा ठिकाणीकेव्हाही घडू शकते. किंबहुना आजवर ती घडली नाही हे आपले मोठे सुदैव! पण अशी कुठली घटना उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरेल हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र दुर्दैवाने असे घडलेच तर गिर्यारोहणासकट सर्वच साहसी खेळांवर अतिशय जाचक बंधने येतील आणि तेव्हा आपली बाजू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कोणीही नसेल… ना पोलीस, ना सरकार, ना न्यायालय. हे टाळायचे असेल तर व्यावसायिक आणि हौशी अशा दोन्ही संस्थांनी (या क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान दोन्ही त्यांच्याकडे असल्याने) एकत्र येऊन अशा गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी काही शिस्त, नियम आणि आपत्कालीन उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. नव्हे, ती त्यांची नैतिक जबाबदारीच आहे. या साठीच कृत्रिम मतभेद आपण विसरायला हवेत.

७. महाराष्ट्र सरकारने आजवर गिर्यारोहणासकट सर्व साहसी खेळासंबंधी नियमावली ठरवून देणारे दोन सरकारी निर्णय (GR) जारी केले आहेत (२६ जून २०१४ आणि २६ जुलै २०१८). २६ जून २०१४ च्या GR मधील जाचक आणि चुकीच्या तरतुदींविरुद्ध आपल्यातीलच काही व्यावसायिक गिर्यारोहकांनी कायदेशीर लढाई लढली आणि सरकारला तो मागे घ्यायला लावला. त्याचा फायदा गिर्यारोहणातील व्यावसायिक आणि हौशी अशा दोन्ही प्रकारच्या संस्थांना झाला. अन्यथा पाच वर्षापूर्वीपासूनच अशा जाचक तरतुदी आपल्या मानगुटीवर बसल्या असत्या.

परंतु आधीचा GR परवडला असा नवीन GR (२६/०७/२०१८) आता महाराष्ट्र सरकारने आणला आहे. त्यात अनेक अव्यावहारिक, जाचक आणि क्लिष्ट नियमांचा आणि तरतुदींचा समावेश तर आहेच पण त्याचबरोबर नियमभंगासाठी कारवाईचा बडगाही त्यात दाखवला आहे. अनेक अंगभूत विरोधाभास असलेला हा GR साहसी खेळ आयोजित करणाऱ्या सर्वच संस्थांना विनापवाद लागू आहे. पण कारवाईची जी टांगती तलवार या GR मुळे लटकते आहे, त्याचा हौशी गिर्यारोहणावर निश्चितच जास्त विपरीत परिणाम होणार आहे. छंद म्हणून गिर्यारोहण करणाऱ्या कोणालाही सरकारी नियमांच्या जंजाळात, कारवाईत अडकायला आवडणार नाही. त्या मुळे हौशी गिर्यारोहकांचा खाजगीरित्या गिर्यारोहण करण्याकडे कल वाढेल. साहजिकच संस्थांच्या नेतृत्त्वक्षमतेवर आणि पर्यायाने त्यांच्या गिर्यारोहणावर अनिष्ट परिणाम होईल. दुर्दैवाने याबाबत गिर्यारोहणातील व्यावसायिक जेवढे जागरूक आहेत त्याच्या काही अंशानेदेखील हौशी गिर्यारोहकांच्या संस्था जागरूक नाहीत असे दिसते. असे का? व्यावसायिक संस्थांचा विचार केल्यास, कारवाईची भीती त्यांनाही आहे. पण व्यावसायिक अस्तित्वाचा प्रश्न असल्याने, त्या काहीही करून, प्रसंगी ज्यादा पैसे खर्च करून, जास्त मनुष्यबळ वापरून सरकारी नियमांची पूर्तता करतील. हौशी संस्थांनाच अंतिमतः जास्त जाचक आणि संकटात आणू शकणाऱ्या GR विरुद्ध लढा मात्र आपण व्यावसायिक म्हणतो (किंवा परके समजतो) असे गिर्यारोहक देत आहेत. हा विरोधाभासच नाही का? हे सांगण्यात कोणाचाही मोठेपणा दाखवण्याचा अथवा उपकाराची जण करून देण्याचा उद्देश नसून व्यावसायिक आणि हौशी गिर्यारोहण संस्थांनी एकत्र येऊन हा लढा द्यायची गरज आहे हे स्पष्ट करायचे आहे.

२६/०७/२०१८ च्या GR मुळे साहसी खेळांवर होणारे असे प्रतिकूल परिणाम लक्षात आल्याने त्या विरुद्धही न्यायालयीन लढाईस सुरवात झाली आहे. ती पुढे नेण्यासाठी आणि यापुढे आपल्या क्षेत्राला विश्वासात न घेता असे जाचक नियम सरकारने लागू करू नयेत म्हणून Maha Adventure Council (MAC) ची स्थापना करण्यात आली आहे. आजवर GR ची लढाई लढणाऱ्या, व्यावसायिक आणि संस्थात्मक अशा दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ गिर्यारोहकांचा MACच्या स्थापनेत पुढाकार आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या २६/०७/२०१८ रोजीचा GR मागे घ्यावा आणि साहसी खेळांचे नियंत्रण हे त्या खेळातील तज्ज्ञ लोकांना करू द्यावे – मग ते व्यावसायिक असोत अथवा हौशी – या मागणीसाठी व्यावसायिक आणि हौशी संस्थांनी तातडीने एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

साहसी खेळात भाग घेणारा प्रत्येकजणच सुरक्षेच्या नियमांविषयी जागरूक हवा, मग तो वैयक्तिक मोहिमेत असो, व्यावसायिक उपक्रमात असो अथवा हौशी संस्थेबरोबर असो. ही जागरूकता येण्यासाठी सध्या आपल्याला गरज आहे ती साहसी खेळातील सुरक्षेची एक आदर्श नियमावली तयार करण्याची. साहसी उपक्रम जेव्हा सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पालन करून आयोजित केले जातील तेव्हा आपोआपच दुर्घटना कमी होतील. अशी नियमावली अस्तित्त्वात येणे हे गिर्यारोहणातील व्यावसायिक आणि हौशी अशा दोन्ही प्रकारच्या संस्थांच्या हिताचे आहे, तसेच ती आणणे ही त्यांची जबाबदारीही आहे. सुस्पष्ट सुरक्षा नियमावली गिर्यारोहणात जागरूकता आणेल, तसेच आपल्या जबाबदारीची योग्य जाणीव आयोजकांनाही असेल. जेवढी जागरूकता जास्त तेवढे साहस अंगावर घेण्याची क्षमता जास्त…तेवढा साहसातील आनंद जास्त….

बेभान साहसा पेक्षा सभान साहस केव्हाही चांगलं….

महेश भालेराव – (हौशी भटक्या गिर्यारोहक)

(लेखात काही तथ्यांच्या चुका असल्यास जरूर दाखवून दयाव्यात. या लेखाचा उद्देश एका मनमोकळ्या संवादाला सुरवात करण्याचा आहे.)

Found useful? Share it with everyone.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *