२६.०७.२०१८ च्या साहसी खेळाशी संबंधित सरकारी निर्णयासंबंधी (GR) काही प्रश्न, काही शंका
१. हा GR सशुल्क व जाहीरपणे आयोजित साहसी उपक्रमासाठी लागू आहे (नियम १, पृष्ठ ६).
म्हणजेच एखाद्या उपक्रमाला हा GR लागू होण्यासाठी तो उपक्रम सशुल्क (for a fee) असायला हवा आणि जाहीरही असायला हवा. एखादा कार्यक्रम सशुल्क असेल पण जाहीर नसेल (फक्त सभासदांसाठी मर्यादित कार्यक्रम) किंवा जाहीर असेल पण सशुल्क नसेल (विनामूल्य कार्यक्रम) तर त्याला या GR मधील कोणत्याही तरतुदी लागू होणार नाहीत असा या नियमाचा अर्थ आहे का? एखादा कार्यक्रम सशुल्क अथवा जाहीर असण्याने सुरक्षाविषयक काळजी घेण्यावर कसा काय फरक पडू शकतो? आणि एखादा कार्यक्रम विनामूल्य असेल किंवा खाजगी असेल तर तो कसाही आयोजीत करण्याचे स्वातंत्र्य अशा आयोजकाला आहे काय? अशा कार्यक्रमात भाग घेणाऱ्या लोकांची सुरक्षितता धोक्यात येत नाही काय? आणि ही पळवाट वापरून कोणी नोंदणी करायचे टाळले तर?
२. हा शासन निर्णय जमिन, पाणी आणि हवा अशा तीनही प्रकारातील साहसी खेळांसाठी आहे असे म्हटले आहे.
पण परिशिष्ट अ, ब , क याचा जर आपण विचार केला तर असे दिसून येते परिशिष्ट-ब हवाई साहसी खेळांसाठी आहे, परिशिष्ट-क जल साहसी खेळांसाठी आहे तर परिशिष्ट-अ मात्र जमिनीवरील साहसी खेळांसाठी नसून फक्त गिर्यारोहणासाठी आहे. मग जमिनीवरील इतर साहसी खेळांचे काय? भारत सरकारच्या अधीन पर्यटन मंत्रालयाने मान्यता दिलेल्या ATOAI ने ( Adventure Tourism Operators Association Of India) मे,२०१८ मध्ये सर्व साहसी खेळांसाठी एक विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात १५ प्रकारचे जमिनीवरील साहसी खेळ समाविष्ट आहेत. यातील फक्त ५/६ गिर्यारोहण या प्रकारात मोडतात. मग इतर प्रकारांना (All Terrain Vehicle Tours (ATV), Bungee Jumping, Cycling Tours, Camel Safaris, Horse Safaris, Jeep Safaris, Motorcycle Tours, Nature Walks / Bird Watching, Artificial Wall Climbing, Personal Light Electric Vehicle Tours, Wildlife Safaris, Zip Wires and High Ropes Courses) ही मार्गदर्शक तत्त्वे लागू नाहीत काय? कारण जमिनीवरील या साहसी खेळांबद्दल परिशिष्ट-अ मध्ये काहीच उल्लेख नाही.
३. नियम क्र ३.१(पृष्ठ क्र ९) मध्ये असे म्हटले आहे की साहसी उपक्रम आयोजकांनी आणि सहभागींनी कोणते प्रशिक्षण प्राप्त करणे आवश्यक आहे हे संबंधित क्रीडा प्रकाराच्या परिशिष्टात दिले आहे.
इथे आपण गिर्यारोहणाचा (परिशिष्ट-अ) विचार करू. या भागात गिर्यारोहण म्हणजे अति उंचीवरील शिखरांवरील तांत्रिक कौशल्य आणि सुरक्षा साधनांचा वापर करून केलेले आरोहण असे म्हटले आहे. थोडक्यात म्हणजे हिमालयातील आरोहण. या संपूर्ण परिशिष्टात फक्त हिमालयातील गिर्यारोहणाची पात्रता, प्रशिक्षण काय असावे याचा उल्लेख आहे. गिरिभ्रमण, प्रस्तरारोहण आयोजकांच्या पात्रतेबद्दल काहीही उल्लेख परिशिष्ट अ मध्ये नाही. मग या दोन्ही प्रकारात प्रशिक्षणाची काहीच गरज नाही असे समजायचे काय?
४. नियम १.७ (परिशिष्ट अ) – क्रीडाप्रकारांच्या निकषानुसार मोहिमांच्यावेळी औषधसामुग्रीसह पात्र वैद्यकीय व्यावसायिकास नेमणे उचित राहील असे या नियमात म्हटले आहे.
इथे सोयीसाठी आपण अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर हे गृहीत धरू. आता ही आवश्यकता आणि निकष कोणी ठरवायचे? GR मध्ये याबाबत काहीही स्पष्टता नाही. मुळात हा नियम व्यावहारिक आहे का? प्रत्येक मोहिमेच्या वेळी डॉक्टर नेणे शक्य होईल का? इतक्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स उपलब्ध असतील का? तसेच आयोजकांवर आणि पर्यायाने सहभागींवर याचा आर्थिक ताण पडणार नाही काय? या तरतुदीचा उपयोग आयोजकांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यासाठी होऊ शकणार नाही का?
तसेच मोहिमेदरम्यान दर्जेदार प्रथमोपचार व्यवस्था आणि अपघातग्रस्त व्यक्तीस तातडीने योग्य त्या रुग्णालयात पोहोचण्यासाठी व्यवस्था केली असणे गरजेचे आहे असे नियम १.७(४)(परिशिष्ट अ) मध्ये नमूद केले आहे. मात्र दर्जेदार प्रथमोपचार व्यवस्था म्हणजे काय आणि रुग्णालयात तातडीने पोचवण्याची व्यवस्था म्हणजे काय याचे काहीही स्पष्टीकरण या नियमात दिलेले नाही. या शब्दरचनेतून काहीही अनुमान निघू शकते आणि काही दुर्दैवी घटना घडल्यास आयोजकांवर अकारण निष्काळजीपणाचे आरोप होऊ शकतात.
५. परिशिष्ट ड (पृष्ठ क्र. ३३) मध्ये साहसी खेळातील सुरक्षा आणि सुटका याबाबत मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यातील काहींचा आपण विचार करू-:
२.३- “साहसी खेळात कार्यरत असलेल्या गटात सामील होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक प्रशिक्षण प्राप्त झालेले असले पाहिजे आणि त्यांनी सहभागी होण्यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त केले आहे याबाबत नेता समाधानी असला पाहिजे.”
या तरतुदीचे नक्की प्रयोजन काय आणि ही तरतूद नक्की कोणासाठी आहे- आयोजकांसाठी की सहभागींसाठी? हे प्राथमिक प्रशिक्षण आणि आवश्यक कौशल्य कोणते? जर ही तरतूद सहभागींसाठी असेल तर हे शक्य आहे काय? जर ही तरतूद आयोजकांसाठी असेल तर त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी एकट्या नेत्याची कशी? त्यासाठी सगळी संस्थाच- पर्यायाने व्यवस्थापनच जबाबदार नाही काय?
२.७ “हेलीकॉप्टर कार्यप्रणालीबाबत नेता परिचित असावा, त्याला हेलीकॉप्टरशी कसा संपर्क साधावा याची माहिती असावी आणि त्याच्या खाली सोडणे आणि वर उचलण्याच्र्या कार्यप्रणालीची माहिती असावी.”
याप्रकारची बचाव मोहीम हे निष्णात लोकांचे काम नाही का? एखाद्या मोहिमेच्या नेत्याला सर्वसाधारण तांत्रिक उपकरणाची माहिती असणे आणि हेलीकॉप्टर कार्यप्रणालीबाबत माहिती असणे यात फरक नाही का? हेलिकॉप्टर कार्यप्रणालीचे प्रशिक्षण कोणत्या संस्था देतात? ही अपेक्षा अवाजवी आणि counter productive नाही का?
२.८ “कोणत्याही हवामानात, दिवस किंवा रात्री, नकाशा किंवा होकायंत्र यांचा वापर करण्यात नेता निष्णात असावा.”
या कौशल्याची नेत्याला कल्पना असणे, माहिती असणे हे योग्य आहे. परंतु या कौशल्यात नेता निष्णात असावा ही अपेक्षा योग्य आहे काय? निष्णात असण्याची खातरजमा कोण करणार? त्यासाठी निकष काय? आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आणि नकाशा किंवा होकायंत्र यांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या किती संस्था मुळात महाराष्ट्रात आणि भारतात आहेत??
२.११ ” कोणत्याही परिस्थितीत, साधन सामुग्रीच्र्या उत्पादकाने प्रमाणित केलेल्र्या क्षमतेचे उल्लंघन होता कामा नये , अतिरिक्त सुरक्षितता याव्यतिरिक्त कोणताही अनधिकृत बदल करण्यात येऊ नये किंवा कनिष्ठ दर्जाची साधने वापरण्यात येऊ नयेत”.
माझ्या मते ही तरतूद म्हणजे एखाद्या मूळ इंग्रजी तरतुदीचे संदर्भ चुकलेले मराठी भाषांतर असावे. या तरतुदीतून अतिरिक्त सुरक्षिततेसाठी उपकरणात अनधिकृत बदल केले तर चालतील तसेच कनिष्ठ दर्जाची उपकरणे वापरली तर चालतील असाच अर्थ निघतो ना? अनधिकृत बदल अतिरिक्त सुरक्षितता कसा काय देऊ शकतो? एखाद्या तांत्रिक उपकरणातील अनधिकृत बदल त्या उपकरणाच्या क्षमतेवर विपरीत परिणामच नाही का करणार? तसेच कनिष्ठ दर्जाचे उपकरण वापरून अतिरिक्त सुरक्षा कशी काय मिळेल? तसेच अशा पद्धतीने बदल केलेले उपकरण अथवा कनिष्ठ दर्जाची उपकरणे वापरताना दुर्दैवाने काही अपघात घडलाच तर दोष मूळ उपकरणाला देणार की कनिष्ठ दर्जाच्या उपकरणाला देणार?
२.१४ अर्हताप्राप्त डॉक्टर बोलावल्यावर येण्यासाठी उपलब्ध असावा.
ही तरतूद कुठल्या प्रकारची आणीबाणी डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे आणि याचे व्यवहारात पालन करणे शक्य आहे काय?
सर्वसाधारणपणे डॉक्टर हे शहरातच उपलब्ध असतात आणि बहुतांश साहसी खेळ हे शहरापासून दूर, कुठेतरी डोंगर-दऱ्यांमध्ये रंगत असतात जिथे कधी-कधी दळणवळणाची साधनेही उपलब्ध नसतात. हिमालयात तर आणीबाणीच्या ठिकाणापासून वाहन पोचू शकेल अशा ठिकाणी (Road Head) पोचायलाच दोन-तीन दिवस लागू शकतात. जखमी अथवा आजारी व्यक्तीला उपचारासाठी तातडीने जवळच्या वैद्यकीय मदत केंद्रात घेऊन जाणे ही सध्या अवलंबिली जाणारी पद्धत आहे. आता अशा आणीबाणीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध असला तरी त्याला कुठे बोलावून घ्यायचे? आणि असा डॉक्टर येईपर्यंत थांबून राहायचे काय? त्यांच्या नेण्या-आणण्याच्या व्यवस्थेचे काय? आणि बोलावल्यावर येण्यासाठी डॉक्टर उपलब्ध ठेवायचा असेल (स्टॅन्ड बाय) तर उपक्रम कालावधीसाठी त्याला मानधन द्यायला नको का?
GR वाचताना माझ्या आकलनक्षमतेनुसार मला पडलेले काही प्रश्न, मनात आलेल्या काही शंका मी इथे मांडल्या आहेत. माझे आकलन चुकीचेही असू शकेल. तसे असल्यास फारच चांगले. आणि अशा चुकीबद्दल मी आगाऊ क्षमायाचना करतो. पण जर ते बरोबर असेल तर????……. सुरक्षेसंबंधी जे नियम, मार्गदर्शक तत्त्वे अथवा तरतुदी असतात त्या सुस्पष्ट आणि व्यावहारिक असाव्यात तसेच सर्वसामान्य माणसालाही समजतील अशा सोप्या भाषेत असाव्यात हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे .
माझी वाचकांना विनंती आहे की २६.०७.२०१८ चा शासन निर्णय(GR) आपण जरूर वाचावा. त्यावर मनमोकळी चर्चा करण्यासाठी MAC ने आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याला प्रतिसाद देऊन आपण आपल्या क्षेत्रासाठी निश्चितच काही चांगले करू शकू.
–महेश भालेराव
एक हौशी गिर्यारोहक