नुकतीच महा ऍडव्हेंचर कौन्सिल ची (MAC) घोषणा झाली आहे. अनेकांच्या शुभेच्छा आल्या आहेत. काही मतं, टीका, साशंकता पण व्यक्त झाल्या आहेत. अशी मतं, टीका, साशंकता व्यक्त करणारे MACच्या बाहेर आहेत तसे आतही आहेत! त्या सर्वांची दखल घेत माझे काही विचार मी इथे मांडत आहे.

अश्या पोस्ट लिहिणाऱ्यांना सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. कारण प्रश्न न विचारणे हे संवाद न साधण्याचे लक्षण आहे – जे MAC ला नको आहे, व MAC च्या कार्याला परवडणार सुद्धा नाही. पुढची पावलं ठरवताना MAC सर्व मतं, टीका, साशंकता ह्यांचा विचार करणार आहे.

MAC ह्या मंचावर ज्यांची ज्यांची नावे आज येत आहेत त्यांच्यावर प्रचंड जबाबदारी आहे ह्यात शंकाच नाही. स्वतःच्या संस्थेच्या अथवा कंपनीच्या कार्यपद्धतीत कसे आणि कोणते बदल घडवून आणायला पाहिजेत ह्याबद्दल ह्या सगळ्यांना किती clarity आहे हा ही एक प्रश्न आहे. कमी-जास्त प्रमाणात आपल्या सर्वांनाच बदल घडवून आणायचे आहेत! पण कार्यपद्धतीत ‘एका रात्रीत’ बदल घडवून आणणे केवळ अशक्य आहे. आर्थिक रित्या हे बदल किती आणि कधी करता येतील ही तर वेगळीच गोष्ट! एका संस्थेचं उदाहरण असं सांगतं की अनेक महिन्यांची वाटचाल करून झाल्यावर काही (उत्कृष्ट) बदल घडून आले. हे सोपं नाहीये, दुर्दैवाने…

मला आता तीन गोष्टी सुचतात त्या लिहितो:

१) MAC ह्या मंचावर ज्यांची ज्यांची नावे आज आहेत त्या व्यक्ती ‘वरून पडलेले’ नाहीत. बऱ्याच जणांच्या ‘चुका’ (सध्याच्या संदर्भात, मार्गदर्शक सूचनांमध्ये न बसणाऱ्या गोष्टी) आपल्यातल्या कित्येक जणांना माहित आहेत आणि अशा कित्येक ‘चुका’ त्यांच्या हातून पुढे घडत राहतीलही. ह्या पुढाकार घेतलेल्या मंडळीच्या कार्यपद्धती बाबतीत, मार्गदर्शक सूचनांच्या प्रमाणे, एकवाक्यता (alignment) आली पाहिजे ह्यात वादच नाही. ह्या प्रक्रियेला वेळ दिला पाहिजे, जर एखाद्या संस्थेने अथवा कंपनीने अपेक्षित असलेले बदल घडवायचा दृष्टीकोन आणि प्रयत्न दाखवले नाहीत तर त्या संस्थेला अथवा कंपनीला MAC मध्ये सदस्य म्हणून राहायचा अधिकार नसेल. या संदर्भात MAC काही ठोकताळे तयार करत आहे जे सर्वांना लागू होतील.

२) कदाचित पहिल्यांदाच असं घडतं आहे की असा पुढाकार घेतलेली मंडळी ‘ऊघडपणे’ कारभार करत आहेत. जाहीर चर्चा करणारे मंच (forum) उभे करू असे MACने सांगितलेच आहे. ह्या चर्चेत सक्रीय भाग घेऊन आपण MACच्या कार्यावर प्रभाव (influence) आणू शकतो. त्याहून चांगलं म्हणजे MACच्या कार्यात सहभागी होणं.

३) MAC आणि MAC मधील आज असलेली मंडळी ह्यांना प्रश्न विचारायलाच हवेत. पण अश्या प्रश्नातून वाद निर्माण करायचा नसेल आणि काहीतरी सकारात्मक घडवायचं असेल तर हे प्रश्न MACच्याच जाहीर मंचावर विचारले जावेत, तेही समजून घेण्याच्या दृष्टीने (with a sense of enquiry) विचारले जावेत. पर्याय-उपाय सकट हे प्रश्न विचारले जावेत असं मला वाटतं.

MACची आता कुठे सुरुवात झाली आहे. साहसी आणि निसर्ग प्रेमी मंडळीत आज कित्येक वर्षांचा अनुभव, ज्ञान व कौशल्य आहे. अश्या लोकांनी एकत्र येऊन MACच्या कार्याला आतून आकार देणं ही गरज आहे. MACची उद्दिष्टे आणि पुढील योजना जाणून घ्याव्यात आणि ह्या अत्यंत महत्वाच्या कामात MAC सदस्य म्हणून सक्रीय भाग घ्यावा असं सर्वांना आवाहन!

धन्यवाद!

शंतनू पंडित, डायरेक्टर MAC

Found useful? Share it with everyone.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *