पुणे : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील डोंगरदऱ्या गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान देत आल्या आहेत. अनेकांनी अवघड, बिकट अशा किल्ले, डोंगर व सुळक्यांवर यशस्वी चढाईदेखील आहे. मात्र यात पुरेशी काळजी घेतली न गेल्याने त्यांना जीवदेखील गमवावा लागला आहे. यंदा राजगड येथे एका गिर्यारोहकाचा झालेला मृत्यू व शनिवारी अनुभवी, मातब्बर गिर्यारोहक अरुण सावंत यांच्या मृत्यूने गिर्यारोहकांवर शोककळा पसरली आहे. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला आपल्या कवेत घेणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत गिर्यारोहकांच्या मृत्यूने नवोदित, शिकाऊ व उत्साही गिर्यारोहकांपुढे काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

दाखविण्यासाठी नव्हे तर स्वत:साठी गिर्यारोहण
कुठल्याही किल्ल्यावर अथवा पर्वतावर गेल्यानंतर तिथे गिर्यारोहणाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी काढण्यावर अधिक भर देताना दिसतात. निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी सोशल मीडियावर फोटो टाकण्याची त्यांची हौस मृत्यूला कारणीभूत होत आहे. अनेकदा तरुण गिर्यारोहक किल्ल्यावर गेल्यानंतर तेथील बुरुजावरून खाली उतरतात. बुरुज जीर्ण झाल्याने त्या जागेवरुन गिर्यारोहण करणे धोकादायक आहे. ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही. अतिउत्साहीपणाच्या भरात जिवाची किंमत त्यांना मोजावी लागते. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. विशेषत: दरीच्या ठिकाणी सेल्फी घेण्याची हौस तरुणांच्या अंगलट आली आहे.

ड्युक्स नोजची मोहीम यशस्वी करणारा पहिला गिर्यारोहक म्हणून अरुणचे नाव घ्यावे लागेल. महाराष्ट्रातील सर्वाधिक अनुभवी व क्रमांक एकचा गिर्यारोहक अशी त्याची ओळख होती. त्याचा अनुभव व कौशल्याबद्दल शंका येण्याचे कारण नाही. त्याने आजवर अनेक मोहिमा यशस्वी करून मार्गदर्शन केले आहे. त्याचा मृत्यू नेमका निसर्गाच्या चुकीने की त्याच्या स्वत:च्या चुकीने झाला याबद्दल सांगता येणार नाही. याउलट परिस्थिती हिमालयात पाहायला मिळते. तिथे निसर्गाची कृपा असल्यास मोहिमा यशस्वी होताना दिसतात. नवोदित, शिकाऊ व हौशी गिर्यारोहकांनी या घटनेवरून शिकण्याची गरज आहे. अरुण सारखा अनुभवी व मातब्बर गिर्यारोहकाला देखील मृत्युला सामोरे जावे लागले. त्यामुळे सातत्याने सराव, अनुभव व तांत्रिक कौशल्य संपादन केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नये. ही गोष्ट तरुण गिर्यारोहकांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

ज्येष्ठ गिर्यारोहक ॠषी यादव

अरुणचे जाणे आम्हा सर्व गिर्यारोहकांसाठी मोठी धक्कादायक गोष्ट आहे. तो एक अनुभवी गिर्यारोहक होता. त्याच्यासारख्या अनुभवी गिर्यारोहकाकडून नेमकी काय चूक झाली यावर लगेच काही सांगता येणार नाही. त्याने त्याच्या गिर्यारोहणाच्या काळात अनेक नवीन वाटा शोधल्या. पुढे त्या सर्वांना माहिती झाल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी राजगड येथे देखील एका गिर्यारोहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आपण ज्या ठिकाणी गिर्यारोहणाकरिता जात आहोत, त्याची पुरेशी माहिती घेणे, आवश्यक ती साधने जवळ बाळगणे महत्त्वाचे ठरते. नवीन लोकांनी गिर्यारोहणाचे धाडस जरूर दाखवावे; मात्र त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. उत्साहाच्या भरात केलेली एखादी चूक जिवावर बेतते. तरुणांना या क्षेत्राची आवड आहे. त्यात त्यांना अधिक नव्याने काही शोधण्याची इच्छा तसेच गिर्यारोहणाची आवड असणे ही स्वागतार्ह गोष्ट असली तरी मोहिमेसाठी आवश्यक तयारी, अभ्यास व मार्गदर्शन घ्यावे, असे त्यांना सांगावेसे वाटते.

उमेश झिरपे, गिर्यारोहक व गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक

सौजन्य: लोकमत

Found useful? Share it with everyone.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *