निसर्गाची हाक- महा ऍडव्हेंचर काऊन्सिल(मॅक)चा  उपक्रम

कामाच्या पहिल्या टप्प्याचा अंतरीम अहवाल

महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळाने अपरिमित हानी झालेली आहे हे आपण सर्वच जण जाणता आहात. विशेषतः कोकण किनारपट्टीतील गावे, पश्चिम घाट आणि कोकणपट्टी जोडणाऱ्या प्रदेशात ही हानी खूपच जास्त आहे. कुठल्याही नैसर्गिक संकटात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दुर्गम वाड्या/पाड्यांमध्ये मदत उशिराच पोचते असा पूर्वानुभव आहे. याच दुर्गम वाड्या-पाड्यातील, लहान-लहान गावातील लोकांशी आपणां सर्वांचेच एक भावनिक नाते आहे. कारण भटकंती दरम्यान याच लोकांनी कधी आपल्याला प्रेमाने जेवू घातलंय, कधी आपल्या झोपडीत राहायला दिलंय तर कधी वाटही दाखवली आहे. म्हणूनच आता अशा संकटकाळी त्यांची मदत करणं ही आता आपली जबाबदारी आहे.

हे जाणून मॅकने या कामासाठी एक चमु नेमला आहे. चक्रीवादळग्रस्त प्रदेशातील नुकसानीचा अंदाज घेणं हे तसं एक आव्हानच होतं. विजेचे खांब, मोबाईल टॉवर,  ट्रान्सफॉर्मर , रस्ते असं सगळंच वादळात उध्वस्त झालंय. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संपर्क साधणे दुरापास्त झाले आहे.

म्हणून मॅकच्या चमुने मग नियोजनबद्धरित्या या आव्हानांचा सामना करायचं ठरवलं. निसर्गप्रेमी भटक्या लोकांमध्ये असलेल्या आपल्या संपर्काचा उपयोग करून काही प्राथमिक माहिती गोळा केली. त्यानंतर जिथे तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे अशा गावांची  प्राथमिक यादी तयार केली गेली. या सर्वच ठिकाणी स्वतः पोचणे मॅकच्या चमुला शक्य नव्हतं. म्हणून मग समविचारी संस्था आणि लोकांबरोबर या कामाची विभागणी केली. या आधीच कळवल्याप्रमाणे मॅकने चार गावांवर लक्ष केंद्रीत केलं: १. राजमाची किल्ला परिसर २. घनगडाच्या पायथ्याशी असलेली एकोले आणि भांबुर्डे ही गावे ३. ठाकूरवाडी(प्रबळमाची) ४. माणिकगड परिसर

यापैकी माणिकगड परिसरात विशेष हानी झालेली नाही असं सुरवातीलाच कळल्याने इतर तीन ठिकाणी लक्ष केंद्रीत करावं असं ठरलं.  या परिसरात आजवर झालेल्या कार्याचा अहवाल पुढे दिला आहे:

  • राजमाची परिसर

हा परिसर लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्याने अनेक लोकांना इथल्या गंभीर परिस्थितीची तशी जाणीव होती आणि त्यामुळे तिथे मदतीला इच्छूक लोकांची संख्याही जास्त होती. म्हणून मॅकने तिथे समन्वयकाची भूमिका निभावण्याचे ठरवले. पुणे फीड द निड या संस्थेसह पुण्यकुमार यांनी इथल्या कामात पुढाकार घेतला. त्यांनी आतापर्यंत ६६ सौर  संच, सौर दिवे आणि मोबाईल चार्जिंग संच पुरवले आहेत. शारदाश्रम फाउंडेशन आणि IRDO या पुण्यातील संस्थांनी हे संच कमी किमतीत उपलब्ध करून दिले आहेत. पुणे फीड द निड या संस्थेने घरावर लावण्यासाठी असबेस्टोसचे ८०० पत्रे द्यायचे ठरवले आहे आणि पुढील तीन दिवसात ते राजमाची परिसरात पोचतील. या परिसरात चालवता येईल अशा 4×4 प्रकारचे वाहतुकीस उपयोगी वाहन डेला ऍडव्हेंचर पार्कच्या गणेश गिध यांच्याकडेच असल्याने त्यांनी या सर्व सामानाच्या वाहतुकीची जबाबदारी घेतली. हे सर्व सामान फणसराई, वन्हाटी, उधेवाडी आणि राजमाची येथील कुटुंबांना वितरीत करण्यात आले. यात तातडीने आवश्यक अशा जलप्रतिबंधक ताडपत्र्या देण्यात मॅकचा सहभाग आहे. आजवर मॅकने तिथे २१५०० चौरस फूट भरतील एवढ्या ताडपत्र्यांचे वाटप केले आहे आणि अजूनही करण्याची योजना आहे. राजमाची परिसरातील या कामावर आतापर्यंत साधारण ७५०००/रुपये खर्च झाले आहेत.

मॅक तर्फे राजेश गाडगीळ आणि ओंकार ओक यांनी इथल्या मदतकार्यात भाग घेतला. त्यांच्याबरोबरच  ‘पुणे फीड द निड’चे श्रीम. गौरी, सोनाली, जितेंद्र हे स्वयंसेवक, शिवदुर्ग, लोणावळा या संस्थेचे गणेश गिध आणि सुनील गायकवाड, पुण्याचे श्री. प्रेमकुमार, राजमाचीचे समीर उंबरे, प्रताप उंबरे, विशाल पाडळे आणि रंगनाथ वारे, IRDO चे सचिन धांडे यांच्यासह इतरही काही लोक राजमाची येथे चालू असलेल्या मदतकार्यात सहभागी आहेत. इथले मदत कार्य ८ जूनपासून सुरू आहे. विश्व हिंदू परिषद, सेवा फाउंडेशन, रा.स्व.संघ., बायकर्स ग्रुप अशा इतरही अनेक संस्थांनी राजमाची येथे विविध प्रकारची मदत केली आहे. (छायाचित्र क्र. १ ते ८) 

२. घनगडाच्या पायथ्याशी असलेली एकोले आणि भांबुर्डे गावं:

घनगडाच्या पायथ्याशी एकोले, भांबुर्डे गावठाण आणि भांबुर्डे आंबेडकर नगर अशी तीन गावं आहेत. लोणावळ्यापासून साधारण ४० कि. मी. अंतरावर ताम्हिणी  घाटाला जोडणाऱ्या रस्त्यावर ही गावे आहेत. ही गावे सह्याद्रीच्या मुख्य धारेवर वसलेली असल्याने वादळी वाऱ्यांचा त्रास तिथे खूपच जास्त प्रमाणात झालाय आणि परिणामी तिथे खूप नुकसानही झाले आहे. वादळाने झालेल्या हानीचा अंदाज घेण्यासाठी राजेश गाडगीळ, तुषार कोठावदे आणि विजय गुर्जर यांनी ८ जुन, २०२० रोजी या परिसराला भेट दिली. ते प्रथम दुपारी १२.३० वाजता तेलबैला या गावात गेले. गावात त्यांना संजय रोकडे आणि रोहिदास वाघमारे हे गावकरी भेटले. ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब आणि तारा उन्मळून पडल्याने गावात विजेचा पुरवठा होत नाहीये. गावात ६०/७० घरे असून त्यातील काही घरांच्या छपरांना हानी पोचली आहे. परंतु तेथील गावकरी एकमेकांना सहकार्य करत असून वादळाने जरी नुकसान झाले असले तरी गावकरी स्वतःच मदत उभारून त्यातून मार्ग काढणार आहेत. परंतु एकोले, भांबुर्डे सारख्या गावांमध्ये झालेली हानी बरीच जास्त असल्याने मॅकने त्यांना आधी मदत करावी असे सुचवले.

दुपारी दीड वाजता आम्ही एकोले गावात पोचलो आणि तिथे झालेली हानी प्रत्यक्ष पाहिली. गावातील १७ घरांपैकी चार घरांचे छत उडाले असून फक्त भिंती शिल्लक आहेत. इतर घरांचेही थोडेफार नुकसान झाले आहे.  गावात विद्युत पुरवठा बंद आहे. गावातील रहिवासी जनार्दन कडू, बाळू कडू आणि सुमित कडू यांनी गावातील लोकांच्या तातडीच्या गरजांची माहिती दिली. त्यांना छतासाठी अंदाजे २०० पत्रे आणि १९ सौर दिवे हवे आहेत. यात केवणी पठारावर असलेल्या एकुलत्या घराचाही समावेश आहे. जिथे राहतात त्या देऊळ आणि शाळेचेही पत्रे उडालेले आहेत. साधारण ५० पत्रे मिळाले तर गावकरी ते पत्रे श्रमदान करून बसवून घ्यायला तयार आहेत.

दुपारी अडीच वाजता आम्ही भांबुर्डे गावठाण आणि आंबेडकर नगर या गावांना भेट दिली. तिथे किसन दत्तू दिघे (PDC – Village Bank Chairman), दिनेश कुंभार यांच्यासह अन्य रहिवाश्यांशी बोलणे झाले.

गावात सध्या वीजपुरवठा नाही. मुख्य गावातील एकूण १८ घरांपैकी १४ घरांना कमीजास्त प्रमाणात हानी पोचली आहे. गावात एकूण ४७ कुटुंबे राहतात. आंबेडकर नगरात (Satellite Settlement) २१ कुटुंब राहतात आणि तिथल्या पाच घरांचे पत्रे तुटले आहेत. तिथे एकूण ८६० पत्रे, चार ताडपत्र्या आणि ३७ सौर दिव्यांची सध्या गरज आहे (छायाचित्र ९ आणि १०).

या साहित्याचा पुरवठा ११ जूनपासून सुरु करायची योजना आहे. आसपासच्या पुरवठादारांकडील माल संपल्याने आम्ही या वस्तू मुंबई किंवा पुण्यातून विकत घ्यायच्या प्रयत्नात आहोत. राजमाचीसारखेच इथेही कमी किमतीत ६० सौर दिवे देण्याचे DRDO च्या सचिन धांडे यांनी मान्य केले आहे. या सर्व साहित्याची अंदाजे किंमत ९,८०,०००/- रुपये आहे. यापैकी ताडपत्र्या घेण्यासाठी आम्ही ६०,०००/- रुपये खर्चही केले आहेत.  

३. ठाकूरवाडी (प्रबळमाची)

मालाड YHA च्या श्रीधर वैशंपायन, प्रकाश तिरलोटकर, सुहास, देवेन आणि त्यांचे अन्य सहकारी मॅकच्या वतीने ठाकूरवाडी, हाळटेप आणि ताराटेप या प्रबळगड परिसरातील गावांमधील मदत कार्य सांभाळत आहेत. त्यांच्या अंदाजाप्रमाणे एकूण ३५० अस्बेस्टोसचे पत्रे आणि २ इंच रुंद आणि २० फुट लांबीचे  १८ लोखंडी पाईप लागणार आहेत. यातील २५० पत्रे स्थानिक ग्राम पंचायतीकडून मिळणार आहेत. त्यामुळे सध्या आपल्याला १०० पत्रे आणि १८ पाईप द्यायचे आहेत. याची एकूण किंमत अंदाजे ७५०००/- रुपये आहे. (छायाचित्र ११ आणि १२)

हा अहवाल तयार करत असतानाच कोयना नगर परिसरातील कुंभार्ली घाटातील कातकरी वस्त्यांमध्येही बरेच नुकसान झाले आहे अशी बातमी आली  आहे. तिथली काही प्राथमिक माहिती आणि छायाचित्र मिळाली आहेत. पुण्याचे विजय गुर्जर आणि त्यांचे मित्र तेथील वस्तूस्थितीची माहिती घेत आहेत. जर पुरेसा निधी जमला तर त्या परिसरातही मदत कार्य करण्याचा आमचा मानस आहे कारण तेथील लोक गरीब आहेत आणि त्यांना उत्पन्नाचा निश्चित असा स्त्रोत नाही (छायाचित्र क्र. १३ आणि १४)

इतरही काही संस्था वेगवेगळ्या ठिकाणी मदत कार्य करत आहेत. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेने जुन्नर तालुक्यातील आहुपे आणि भिवाडे, मुळशी तालुक्यातील काशिग या गावांमध्ये मदत कार्याचा पहिला टप्पा पार पाडला आहे. डोंबिवलीची ट्रेक क्षितीज संस्था सुधागड परिसरात कार्य करतेय. इरशाळगड, माथेरान आणि प्रबळगड या त्रिकोणात पसरलेल्या छोट्या-छोट्या वस्त्यांमध्ये पनवेलची निसर्ग मित्र संस्था काम करतेय. बोरघाटातील उंबरवीरा आणि खालापूर जवळील चिंचवलीपाडा अशा दूरस्थ गावांमध्ये यशवंती हायकर्सचे मदत कार्य चालू आहे .

अहवालकर्ता: राजेश गाडगीळ, कार्यकारिणी सदस्य, मॅक

या सामाजिक कार्याला सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी हे आपणा सर्वांना विनम्र आवाहन. आपण गिरीविहार संस्थेच्या खात्यात जमा केलेली देणगी  आय कराच्या कलम 80G खालील वजावटीस पात्र आहेत. आपण खालील प्रकारे देणगी देऊ शकता:

धनादेश/डिमांड ड्राफ्ट/बँक ट्रान्स्फर( RTGS/NEFT/IMPS/Google Pay):

खातेधारकाचे नाव: गिरीविहार

बँक: HDFC बँक

शाखा: दादर

बचत खाते क्रमांक:  50100196450717

IFSC क्र.: HDFC0000084

क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/ wallet:




अधिक माहितीसाठी कृपया खालील व्यक्तींशी संपर्क साधावा:

दिलीप लागू: dilip@lagubandhu.com

राजेश गाडगीळ: 9821094725, rajesh.gadgil1@gmail.com




Found useful? Share it with everyone.

One Reply to “निसर्गा’ची हाक- पहिला टप्पा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *