एव्हरेस्टवरील पहिल्या आरोहणानंतर (१९५३) महाराष्ट्रात गिर्यारोहण या साहसी खेळाचा हळूहळू प्रसार होऊ लागला. सुरुवातीच्या टप्प्यात महाविद्यालयीन स्तरावर आणि त्याच वेळी काही तुरळक संस्थांतून गिर्यारोहणाची पाळेमुळे रुजत गेली. या पार्श्वभूमीवर, ऐंशी-नव्वदच्या दशकांत महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्र सह्याद्रीला भिडतानाच एक्स्पान्शन बोल्टसारखी साधने वापरू लागले. याच घडणीच्या काळात, १९७५ मध्ये अरुण सावंत यांची डोंगराशी ओळख झाली. १९८३ मध्ये नाणेघाटाजवळचा वानरलिंगी म्हणजेच खडा पारशी सुळक्यावर यशस्वी आरोहणानंतर सह्य़ाद्रीत सुळके आरोहणाचे पेवच फुटले. अरुण सावंत यांनी या सुळके आरोहणात वेगाने मुसंडी मारली. नेचर लव्हर्स, हॉलिडे हायकर्स, केव्ह एक्स्प्लोर्स अशा संस्थांनी एकत्रितपणे अनेक सुळक्यांवर आरोहणाचा धडाकाच लावला. अरुण सावंत यांनी त्यात चांगलीच आघाडी घेतली. डिसेंबर १९८३ मध्ये माहुलीतील भटोबा सुळका, पाठोपाठ एप्रिल १९८४ मध्ये सटाण्याजवळच्या तुंगी सुळक्यावर त्यांनी आरोहण केले. हरिश्चंद्रगडाजवळचा शेंडी सुळका, कळकराय, भिव्याची काठी अशा आरोहणांनी वेग घेतला.यामध्ये सर्वात लक्षणीय आणि कौशल्यपूर्ण आरोहण होते ते नागफणी म्हणजेच डय़ूक्स नोजचे.

मुंबई-पुणे जुन्या मार्गावर बोर घाटाच्या अखेरच्या टप्प्यात आकाशात घुसलेले सह्य़ाद्रीचे टोक. सुळक्याच्या पायथ्याला पोहोचण्याचा मार्ग शोधण्यापासून सुळक्यावरील मधमाश्यांचा धोका टाळण्यापर्यंत अनेक आव्हानांना सामोरे जात अरुण सावंत यांनी एप्रिल १९८५ मध्ये नागफणीचे आरोहण यशस्वी केले आणि नागफणीच्या आरोहणावर त्यांचे नाव कायमचे कोरले गेले.

गेल्या काही वर्षांत त्यांनी आपले लक्ष आरोहणापेक्षा सह्य़ाद्रीतील अनगड अशा ठिकाणांकडे वळवले होते. त्याजोडीला रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंगचे उपक्रमदेखील सुरू होते. त्यातून पुढल्या पिढीशीही त्यांनी नाते जोडले खरे, पण यांच्या व्यवहार्य उपक्रमांवरून टीकेचे प्रसंगदेखील उद्भवले. मात्र त्यापूर्वीच्या काळात रेस्क्यू टीम अर्थात बचाव पथक ही संकल्पना पुरेशी उलगडलेली नव्हती. अशातच १९८६ च्या भर पावसाळ्यात हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावरून पडलेल्या अरविंद बर्वे या ट्रेकरचा मृतदेह शोधण्याचे आव्हान अरुण यांनी स्वीकारले. प्रचंड जिद्दीने त्यांनी त्या अजस्र कोकणकडय़ावरून रॅपलिंग करून मृतदेह शोधला. त्याच कोकणकडय़ावरील एका उपक्रमादरम्यान गत शनिवारी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

सौजन्य: लोकसत्ता

Found useful? Share it with everyone.

One Reply to “व्यक्तिवेध: अरुण सावंत”

  1. *अभिवादन* अरूण सांवंत सर,
    तुमच्या मुळे सह्याद्रीच्या रूपांत अनेक मार्गाने अनोखा रंग भरला.
    अंबादास कदम.(MAC सदस्य.)
    चिंचवड,पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *